16/12/2025
स्त्री-स्वातंत्र्य
स्त्रीचं स्वातंत्र्य हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. मुळात स्त्री ही कुठल्याही बंधनात असूच शकत नाही. स्त्री बंधनात असती तर आज एवढे यशस्वी संसार आणि मुलांवर संस्कार घडलेच नसते. आम्ही स्त्रियांनीच हे कुंपण स्वतःभोवती आखून घेतले आहे. स्वतःला मान द्यायला शिका. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी कसं वागायचं कसं जगायचं हे तिसरं कुणीतरी ठरवतो आणि तिथेच सगळं चुकतं.
पुरुष आणि स्त्री मधला फरक एवढाच आहे की स्त्री सुंदर आहे आणि इथेच तिच्यावर मर्यादा येतात आणि मला असं वाटतं त्या मर्यादा स्त्रीने बंधन म्हणून न घेता ते तिचं अस्तित्व म्हणून घेतल्या पाहिजेत, आणि आपल्या मर्यादा, ज्या स्त्रीला आणि पुरुषांना दोघांनाही सारख्या असतात त्या जपल्या पाहिजेत.
शारीरिक ताकद पुरुषांना जास्त देण्यामागे निसर्गाचे गणित अगदी अचूक आहे. पुरूषामधली ताकदही स्त्रीकडे असती तर मग अख्खा विश्वाचा भार स्त्रीवरच आला असता. म्हणून तर नऊ महिने बाळ पोटात वाढवून त्याला जन्म देण्याची ताकद आणि जबाबदारी स्त्रीकडे देऊन निसर्गाने स्त्रीच्या सहनशक्तीचा आणि शक्तीचा जणू पुरावाच जगाला दिला आहे.
म्हणून स्त्री ही स्वतंत्र नाही ती अबला आहे यावर माझा मुळीच विश्वास नाही. तिने जर मनात आणलं तर अगदी कुठलही आवाहन स्वीकारू शकते.म्हणून स्त्री ही स्वतंत्र नाही यावर माझा विश्वासच नाही.
या विषयावर बोलू तेवढे कमीच आहे, पण वेळेची मर्यादा राखत मी एवढेच सांगू इच्छिते की स्त्री ही नेहमीच स्वतंत्र आणि शक्तिशाली होती आणि आहे आणि म्हणूनच हा समाज जिवंत आहे.
धन्यवाद
मेघा खांडेपारकर